वृत्तसंस्था गडचिरोली : चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यात वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले. गुरुवारी सकाळ आठ वाजताच्या सुमारास देसाईगंज वनपरिक्षेत्रातील वळूमाता जंगल परिसरात वन विभाग आणि विशेष पथकाने ही कामगिरी पार पाडली.
१३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील विशेष पथक गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्नरत होते. वळूमाता प्रक्षेत्रात दोन दिवसांपूर्वी या वाघाने गायीला ठार केले होते. त्यामुळे तो पुन्हा या ठिकाणी येणार याची खात्री असल्याने रात्रीच वनविभागाने विशेष पथकाला या ठिकाणी पाचारण केले होते.त्याठिकाणी वाघासाठी शिकार म्हणून गायदेखील ठेवण्यात आली होती. अखेर पहाटेच्या सुमारास सीटी १ वाघ जाळ्यात अडकला. टप्प्यात येताच शुटरने त्याच्यावर डार्ट (बेशुद्धीचे इंजेक्शन) डागला. या वाघाला आता पिंजऱ्यात ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
Commentaires