वृत्तसंस्था नाशिक – इगतपुरी तालुक्यात शनिवारी गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ११ संशयितांना ताब्यात घेतले. सोमवारी त्यांना इगतपुरी न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर मार्गावरील गंभीरवाडीजवळ शनिवारी सायंकाळी गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून कार अडविण्यात आली. कारमधील दोन जणांना १० ते १५ जणांनी गज आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत अफान अन्सारी (३२) याचा मृत्यू झाला. तर, नासिर हुसेन कुरेशी (२४) हा गंभीर जखमी झाला. त्याला धामणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही मुंबईतील कुर्ला (पूर्व) येथील कुरेशी नगरातील रहिवासी आहेत.
या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप आणि अन्य अधिकाऱ्यांनी घोटी येथे धाव घेत संशयितांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये जिवराम गवळी, किरण गवळी (रा. पांढुर्ली, सिन्नर), राहुल वाकचौरे (रा. पिंपळगाव डुकरा, इगतपुरी), महेश गाढवे (रा. धामणगाव, इगतपुरी), भूषण अहिरे, संकेत सानप, लक्ष्मण गोडसे, हेमंत परदेशी, रोशन तुपे, गणेश तुपे, राहुल वाकचौरे यांचा समावेश आहे. हे सर्वजण इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत. संशयितांना सोमवारी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Commentaires