दोन ते पाच हजार रुपयांमध्ये दहावी-बारावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चेंबूर परिसरातून अटक
केली.
वृत्तसंस्था :- दोन ते पाच हजार रुपयांमध्ये दहावी-बारावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चेंबूर परिसरातून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून प्रमाणपत्र तयार करण्याचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे हस्तगत केली.
शिवडीच्या क्रांतीनगर परिसरात काही व्यक्ती दहावी-बारावीचे बनावट प्रमाणपत्रांची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी सापळा रचून दोघाना ताब्यात घेतले. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात ही बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चेंबूर वाशीनाका येथील फारुख गल्लीत राहणाऱ्या दानिश खानच्या (२६) घरी छापा घातला. तेथे संगणकावर बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात येत असल्याचे उघडकीस आले.
आरोपींनी दोन ते पाच हजार रुपयांमध्ये अनेकांना दहावी-बारावीची प्रमाणपत्रे, तसेच कंपनीत काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दानिशसह तेथे काम करणाऱ्या हुसेन चौधरी (२६), सलमान खान (२१) आणि मोहम्मद फैज शेख (२१) यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे हस्तगत केली.
Kommentare