top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी;आमचा तिसरा विरोधी पक्षनेता तरी पळवू नका- अजित पवार



मुंबई:(वृत्तसंस्था) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथही घेतली. याचे पडसाद आज सभागृहात उमटताना दिसले. भाजपने आता आमचा तिसरा विरोधी पक्षनेताही पळवून नेऊ नये, अशी मिष्किल टिप्पणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. आधी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले, त्यांना भाजपने सत्तेत घेतले. यानंतर विखे-पाटलांनाही तुम्ही तिकडे ओढून घेतले. आता तिसरे झाल्यानंतर त्यांना मात्र तिकडे घेऊ नका. निदान निवडणुका होईपर्यंत तरी त्यांना इकडे राहू द्या,  अशी कोपरखळी अजित पवार यांनी लगावली. यावेळी अजित पवार यांनी रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार नियुक्ती करावी, अशी मागणीही अध्यक्षांकडे केली. यासंदर्भात आम्ही पत्र दिले असून त्याविषयी लवकरात लवकर निर्णय घेतला जावा. विरोधी पक्षनेतेपद हा आमचा हक्क आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही विरोधकांना टोला लगावला. आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे कुठे जायचे हा अधिकार प्रत्येकालाच आहे. उद्या विजय वडेट्टीवार यांनाही आमच्याकडे यावेसे वाटले, तर त्यांचे स्वागत आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.तेव्हा विजय वडेट्टीवार यांनीही लगेच उभे राहत मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिले. मी एकवेळ फसलो. मी सध्या आहे तिथे खुश आहे. पण वारंवार निष्ठा बदलल्याने संबंधित व्यक्तीविषयी शंका उपस्थित होतात, असे सांगत वडेट्टीवार यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना टोला लगावला.

1 view0 comments

Comentários


bottom of page