वृत्तसंस्था :- मुंबई : मुंबई महानगरपालिका सेवेत कार्यरत असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. लटके यांचा राजीनामा मंजूर करावा यासाठी बुधवारी शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात ठाण मांडून बसले होते. मात्र महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लटके यांच्या राजीनाम्याबाबत शेवटपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान, आयुक्तांवर बंडखोरांचा दबाव असून या दबावाखाली महानगरपालिका आयुक्त काम करीत असल्याचा आरोप माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. १४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून तोपर्यंत राजीनामा मंजूर न झाल्यास लटके यांना ही निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे बुधवारी दुपारपासून महानगरपालिकेच्या मुख्यालयात शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी ठाण मांडले होते. आयुक्त कार्यालयातील उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळ दुपारी १.३० च्या दरम्यान दाखल झाले. यानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर आरोप केले. ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला असून त्यांनी एक महिन्याचे वेतन महानगरपालिकेकडे जमा केले आहे. तरीही आयुक्तांनी राजीनामा मंजूर केलेला नाही. राजीनामा मंजूर का केला नाही याबाबत प्रश्न विचारल्यावर आयुक्त काहीही उत्तर देत नाहीत.लटके यांच्या राजीनाम्यावर अद्याप विचार सुरू आहे. त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला आहे. नियमाप्रमाणे ३० दिवसांत निर्णय घेता येतो. यामध्ये राज्य सरकारचा कोणताही दबाव नाही, असे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
ऋतुजा लटके यांनी महानगरपालिकेतील आपल्या पदाचा (कार्यकारी सहाय्यक) दोन वेळा राजीनामा दिला असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी २ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा राजीनामा दिल्याचे आढळून आले आहे. त्यावरून आता राजकारण रंगले असून राजीनाम्याचा हा घोळ ठाकरे गटाकडून हेतूपुरस्सर होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. आपल्या मर्जीतील उमेदवार देण्यासाठी हे राजीनाम्याचे नाटय़ सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे. लटके यांनी दोनदा राजीनामा पत्र दिले आहे. मात्र अशा अटी – शर्तीवर राजीनामा देता येत नाही हे ठाकरे गटाच्या कायदेपंडीतांना माहीत नाही का, असा सवाल भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. माजी कायदामंत्री अॅड. अनिल परब यांना आपल्या मनातील उमेदवाराला संधी द्यायची असल्यामुळे हे नाटक सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.
Comments