(वृत्तसंस्था) राज्यातील सत्ता स्थापनेवरून वाद विकोपाला गेल्यानंतर शिवसेनेनं भाजपाशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे संकेत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून दिले होते. राऊत यांच्या ट्विटनंतर शिवसेनेचे केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. सकाळी अकरा वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ते राजीनामा देणार आहेत. लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच पहिल पाऊल म्हणजे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सावंत यांनी ट्विट करून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. “लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना (भाजपा आणि शिवसेना) तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे,” असं सावंत यांनी ट्विट करून सांगितल आहे. रविवारी सत्ता स्थापन करण्यास भाजपानं नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला रविवारी (१० नोव्हेंबर) आमंत्रण दिलं. सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडं आजचा दिवस असून, शिवसेना बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी काय तडजोडी करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घ्यावीच लागणार आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. तर शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडण्याविषयी भूमिका घ्यावी लागेल, तरच आम्ही पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीनं म्हटलं होत. त्यानंतर शिवसेनेनं भाजपाला दूर करत ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments