top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

शाळा-कॉलेजांमधून ‘फास्ट फूड’ हद्दपार


(वृतसंस्था) चिभेचे चोचले पुरवित असले तरी याचे आरोग्यावर होणारे विपरित परिणाम सध्या सातत्याने दिसून येत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या सकस आहार मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तब्बल ५९ शाळा-कॉलेजांनी पुढाकार घेत त्यांच्या कॅण्टीनमधून 'फास्ट ‌फूड'ना हद्दपार केले आहे. या कॅण्टीनमधून आता विद्यार्थ्यांना सकस पदार्थ चाखता येत आहेत. नोकरदार पालकांची गरज म्हणून शाळेत कॅण्टीनची व्यवस्था असली तरी बहुतांश शाळांमध्ये सध्या 'फास्ट फूड'ला पसंती दिली जाते. येथील खाद्यपदार्थ हे शारीरिक वाढीसाठी घातक असल्याची बाब वारंवार समोर आली आहे. उच्च रक्तदाब, वाढते वजन, नैराश्य यांसारख्या आजारांच्या विळख्यात विद्यार्थी अडकत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शाळा तसेच कॉलेजांमध्ये सकस आहार असावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तीन महिन्यांपूर्वी या मोहिमेची सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत ५५७ शाळा-कॉलेजांना कॅण्टीनमधील मेन्यू बदलण्याबाबत पत्र दिले होते. आत्तापर्यंत ११ शाळांमध्ये या मोहिमेसंदर्भात बैठका घेण्यात आल्या असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील ५९ शाळा, कॉलेजांनी कॅण्टीनचे सर्वेक्षण करत मेन्यूमध्ये आवश्यकतेनुसार बदल केला आहे. या शाळांमध्ये केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांना 'फास्ट फूड' दिले जात नसल्याने त्याला पर्याय म्हणून सकस पदार्थांचा विचार केल्याचे शाळांच्या प्राचार्यांनी सांगितले. मागील महिनाभरापासून हा बदल केला गेला असून त्याला विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. असे केले बदल... 'फास्ट फूड' बंद शुद्ध शाकाहारी पदार्थांमध्ये वैविध्य पोहे, थालिपीठ यांसारख्या पारंपरिक पदार्थांना प्राधान्य फळांचाही समावेश सिंघानिया शाळेत यापूर्वीच सकस आहाराचा आग्रह होता, मात्र या मोहिमेमुळे मार्गदर्शन मिळाले. ब्रेडचा वापर अधिकाधिक होत असल्याने तो बंद करून मैद्याऐवजी गव्हाचा वापर सुरू केला आहे. मोहीम सुरू केल्यापासूनच शाळा तसेच कॉलेजांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बैठका, मार्गदर्शन कार्यशाळा यांच्या माध्यमातून प्राचार्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात असून टप्प्याटप्याने अधिक शाळांमध्ये उपक्रम राबविला जाईल. गाड्यांवर कारवाई व्हावी शाळांच्या आहारात बदल केला जात असला तरी शाळांबाहेर असलेल्या गाड्यांवर 'फास्ट फूड'ची विक्री सर्रास होत आहे. शाळांमध्ये हे पदार्थ मिळत नसले तरी विद्यार्थी शाळेबाहेरील गाड्यांवर ताव मारत असल्याने या मोहिमेअंतर्गत अशा गाड्यांवरही कारवाई व्हावी अथवा त्यांचे ठिकाण बदलले जावे, अशी मागणी शाळांच्या मुख्याध्यापकांनी केली आहे.

19 views0 comments

Comments


bottom of page