वृत्तसंस्था:- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण मंडळाने पहिली ते आठवीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आणखीन एक ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खास बाब म्हणून दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना घरीच तपासण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात एक पत्रक मंडळाने जारी केलं आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यानंतर चिंतेत असलेल्या शिक्षकांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तापसणीवरून सुरू असलेल्या गोंधळावर शिक्षण विभागाने हा तोडगा काढला आहे. त्यामुळे शिक्षकांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे.
बोर्डामार्फत घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० दरम्यान पार पडली होती. तर १० वीची परीक्षा ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान पार पडणार होती. मात्र दहावीचा शेवटचा पेपर म्हणजेच भूगोलाचा पेपर करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी उत्तपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम सुरु करण्यासंदर्भात बोर्डाने महत्वाची घोषणा केली आहे. “राज्यातील करोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळेत येऊन उत्तपत्रिकांचे परीक्षण आणि नियमन करण्यात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणे आवश्यक असल्याने खास बाब म्हणून केवळ या परीक्षेच्या उत्तरपत्रिका काही अटी आणि शर्तीसहीत शिक्षकांना घरी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार बोर्डाने शिक्षकांना दिला देत या आदेशाचे पालन करत उत्तरपत्रिका घरी देण्याचा निर्णय घेतला आहे,” असं बोर्डाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
बोर्डाने शिक्षकांना घातलेल्या अटी कोणत्या?
१) ही परवाणगी केवळ या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांपूर्ती देण्यात आली आहे. २) देण्यात आलेल्या उत्तपत्रिका मोजून आणि सुस्थितीमध्ये असल्याची खात्री करुन शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संबंधित प्रमुखांकडून ताब्यात घ्याव्यात. ३) उत्तरपत्रिकांचे परिक्षणक आणि नियमन घरातून करताना त्याची पूर्णत: गोपनीयता आणि सुरक्षिता राखली जाईल याची संबंधित शिक्षकांनी दक्षता घ्यावी. ४) उत्तरपत्रिकांचे परीक्षण किंवा नियमन वेळेत पूर्ण करुन त्या विहित पद्धतीने गोपनीयता व सुरक्षितता विचारात घेऊन संबंधितांकडे हस्तांतरीत कराव्यात. ५) आपल्याकडील उत्तरपत्रिका खराब होणार नाही अथवा गहाळ होणार नाही याची सर्वोतोपरी दक्षता शिक्षकांनी घ्यावी.
コメント