top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

विम्यासाठी वाहनाचा अपघात होऊन मद्यसाठा चोरीस गेल्याचा बनाव; सहा संशयितांसह मुद्देमाल ताब्यात








वृत्तसंस्था नाशिक – मद्याच्या कंपनीतून वाहन चालकाने मद्यसाठ्याची परस्पर विक्री करून वाहन पुढे जाताना अपघात होऊन मद्यसाठ्याची तूटफूट झाल्याचा बनाव रचला. त्यातील मद्यसाठा चोरीला गेल्याचे भासवून पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देऊन मोटार विमा कंपनीकडून आर्थिक मोबदला घेण्याचा बेत आखणाऱ्या सहा संशयितांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ३२ लाख १८ हजार ७२० रुपयांचा चोरी गेलेला मद्यसाठा ताब्यात घेतला.



दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथील मे. परनॉड रिकार्ड इंडिया प्रा. लि. यांच्याकडून अजंता ट्रान्सपोर्ट कंपनीने त्यांच्या वाहनात विदेशी मद्याच्या ४६ हजार ८० बाटल्यांचे ९६० खोके नांदेड येथील मे. अलका वाईन्सला पोहचविण्यासाठी भरले. हे वाहन जिंतुर-परभणी रस्त्यावरील पांगरी शिवारात अपघातग्रस्त झाले होते. यावेळी मालवाहतूक वाहनामधील मद्यसाठ्याची मोजणी केली असता तफावत आढळून आल्याने परभणी येथील राज्य उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकांनी त्याबाबत जिंतुर पोलीस ठाण्यात मद्यसाठा चोरीविषयी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी अपघातग्रस्त मालमोटार चालकाने अपघात होण्याआधीच मद्यसाठा परस्पर विक्री केला असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मालमोटार मार्गस्थ झाल्यानंतर पुढे कोणत्या ठिकाणी गेली, मद्यसाठा कोठे असू शकतो, याबाबत तांत्रिक यंत्रणेच्या सहाय्याने माहिती मिळवित नाशिक जिल्ह्यात तपासासाठी चार पथके तयार करण्यास सांगितले.



दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी राज्य उत्पादन शुल्क ब विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख यांच्या पथकाने वाडीवऱ्हेजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर व्हीटीसी फाटा येथे या मालमोटारीतील मद्याचे १०० खोके आणि दोन संशयित ताब्यात घेतले. निरीक्षक साबळे यांच्या पथकाने खंबाळे शिवारातील हॉटेल सारेगामा आणि ईगतपुरीतील धामणी शिवार या दोन्ही ठिकाणांहून दोन संशयित आणि ५४ खोके हस्तगत केले. ब विभागाच्या निरीक्षकांसमवेत अ विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर आणि विभागीय भरारी पथक नाशिकचे निरीक्षक अरुण चव्हाण यांच्या पथकाने वडनेर दुमाला शिवारातून २०० खोके जप्त केले.



या एकूण कारवाईत संदिप गायकर, राजेंद्र पवार, धनंजय भोसले, रोहित शिंदे, अजीज शेख, अजीत वर्मा या सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या एक लाख ६९ हजार ९९२ बाटल्यांचे ३५४ खोके, मालवाहू वाहन असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.



26 views0 comments

Comentarios


bottom of page