वृत्तसंस्था:- चीनच्या ‘वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या प्रयोगशाळेतून करोना विषाणू निसटला व त्याने जगात दीड लाख बळी घेतल्याच्या प्रकरणी चौकशी करीत असल्याचे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, चीनमध्ये ३४ हजारांहून जास्त बळी गेले असून त्या देशाने माहिती लपवली आहे, असा आरोप त्यांनी केला. करोना विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून निसटला होता व तेथूनच तो सगळीकडे पसरला असे सांगितले जात असून अमेरिका आता त्याची गुप्तचर चौकशी करीत आहे, अशी बातमी फॉक्स न्यूज वाहिनीने दिली होती.हा विषाणू वुहानमधील विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचे आतापर्यंत सांगण्यात येत आहे. त्याचा छडा लावण्यासाठी अमेरिकी गुप्तचर या प्रयोगशाळेची माहिती गोळा करीत असून विषाणू तेथून कसा पसरला याची माहिती घेत आहेत.
ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे पत्रकारांना सांगितले की, करोनाचा विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेतून पसरल्याची चौकशी करण्यात येत आहे. कारण त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. इतरही देश याबाबत चौकशी करीत आहेत. वुहानच्या प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर पडला या आरोपाची चौकशी करणार का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की कुठल्या तरी वटवाघळातून विषाणू पसरल्याची चर्चा आहे. पण ते वटवाघूळ त्या भागात नव्हते यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. प्राण्यांच्या बाजारात वटवाघळे विकली गेली नव्हती, तर ४० मैल दूर अंतरावर ती एका प्रयोगशाळेत होती.
फॉक्स न्यूजने दिलेल्या बातमीत विषाणू कसा सुटला याचा घटनाक्रम सांगण्यात आला असून अचूक चित्र उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, तो विषाणू चीनमधल्या कुठल्या भागातून आला याला महत्त्व नाही. तो चीनमधून आला व त्यामुळे १८४ देशांना फटका बसला हे गंभीर आहे. या प्रकारामुळे आता वुहानमधील स्तर ४ मधील प्रयोगशाळेला आता अमेरिका निधी बंद करणार आहे. तेथील प्रयोगशाळेला ओबामा प्रशासनाने ३७ लाख डॉलर्सची मदत दिली होती, आता ती बंद करीत आहोत.
Comments