top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

रविवारपासून नाशिकमध्ये पाणीकपात; पाऊस लांबल्यास दर गुरुवारी पाणी नाही




नाशिक :- (चीफ ब्युरो)संपूर्ण राज्यात मान्सून लांबल्याने पावसाअभावी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मुंबई- कोकणातून नाशिककडे येणारा पाऊस अद्यापही सक्रीय नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्याची पातळी खालवली आहे. यामुळे प्रसंगावधान राखत येत्या रविवारपासून शहरात दोन वेळेला होणारा पाणीपुरवठा एकवेळ करण्यात येणार आहे.जर येत्या दोन ते तीन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. ते आज महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.ते म्हणाले, शहरावरील पाणीटंचाईचे सावट पडण्याची शक्यता लक्षात घेत महापालिका प्रशासनाकडून पाणी कपातीची घोषणा करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी महापौर रंजना भानसी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी गंगापूर धरणावर पाहणी केल्यानंतर शहरात पाणी कपात करण्याचे जाहीर करीत यासंदर्भातील अहवाल देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी देखील पाहणी करीत काही महत्त्वाच्या सूचना देऊन यासंदर्भातील वास्तव माहिती मागवली होती. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून आयुक्तांना अहवाल व पाणी कपातीचे नियोजन यासंदर्भातील माहिती देण्यात आली. दरम्यान, आज आयुक्तांनी पाणी कपातीचे अधिकृत घोषणा केली.सध्या शहराला ४५० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असून यात मुकणे थेट योजनेतून ७५ गंगापूर धरणातून ३७५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. गंगापूर धरणातील चर खोदण्याचे काम सुरू आहे. गंगापूर धरणावरील ताण कमी करण्यासाठी मुकणे योजनेतून ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. तसेच दारणातून जास्तीत जास्त पाणी उचलता यावेत, याकरिता आयुक्त गमे यांनी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागासोबत चर्चा केली आहे.यानुसार एक, दोन दिवसांत दारणातून आवर्तन सोडण्यात येणार असून त्यानंतर येथून शहरासाठी २०० एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. अशाप्रकारे पुढच्या काही दिवसांत गंगापूरमधून ४५० ऐवजी ३९० एमएलडी पाणी उचलले जाणार आहे.दरम्यान, आज पाणीकपातीचा निर्णय झाल्यानंतर आता दररोज ५० ते ६० एमएलडी पाणी कपात करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

2 views0 comments

Comments


bottom of page