वृत्तसंस्था मालेगाव : बकरी ईदनिमित्त कुर्बानी देताना जनावरांची कत्तल उघड्यावर न करता अधिकृत कत्तलखान्यांमध्येच करावी अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आणि महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्याला न जुमानता येथे काही ठिकाणी जनावरांची उघड्यावर कत्तल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उघड्यावर झालेल्या कत्तलीमुळे रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे मोसम नदीपात्रात आल्याने संतप्त झालेल्या सार्वजनिक नागरी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत या प्रकाराचा धिक्कार केला.
जनावरांच्या कत्तलीनंतर रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे मोसम नदीपात्रात जाते. या नदीचे पाणी पुढे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात जाते. त्यामुळे या विरोधात येथील जागरुक नागरिकांतर्फे सातत्याने आंदोलने करण्यात येतात. ही समस्या महापालिका आणि पोलीस या दोघांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरत असते. त्यावर अद्याप तरी ठोस उपाय योजना होऊ शकलेली नाही.
Comments