काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडून तीन दिवस झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. राहुल यांनी शनिवारनंतर कोणत्याही राजकीय कार्यक्रमास हजेरी लावलेली नाही. ते काँग्रेसच्या नव्या खासदारांनादेखील भेटलेले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचे मानले जात आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी राहुल यांचा प्रस्ताव एकमताने फेटाळला असला तरी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीनेच पक्षाध्यक्षपद सांभाळावे, या मतापासून राहुल यांना परावृत्त करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलेले नाही.या निवडणुकीत फार थोडय़ा जागांमध्ये वाढ झाली असली, तरी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे देशातील या सर्वात जुन्या पक्षाची सूत्रे आता गांधी घराण्याबाहेरील नेत्याच्या हाती दिली जावीत, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा मिळाल्या असून गेल्या वेळपेक्षा केवळ आठ जागा वाढल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी पक्षापेक्षा स्वत:च्या कुटुंबाचे हित जपल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता. कार्यकारिणीमधील बहुतांश सदस्यांना लोकसभेच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे द्यायची हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पक्षाध्यक्षाच्या मुद्दय़ावर काँग्रेसमधून कोणीही अधिकृतपणे जाहीर निवेदन देण्यास तयार नसल्याने दिल्लीत काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घुसळणीबाबत चर्चेला उधाण आले आहे. अखेर सोमवारी प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निवेदन प्रसिद्ध केले. ‘‘बंद दरवाजाआड झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काय झाले याची जाहीर चर्चा करणे योग्य ठरणार नाही. या बैठकीच्या आधारे सुरू असलेल्या चर्चा या निव्वळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये,’’ असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांना केले आहे. भविष्यातील वाटचालीबाबत काँग्रेस पक्षाकडून होणाऱ्या प्रयत्नांची यथावकाश माहिती दिली जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परंतु प्रियंका गांधी-वड्रा यांच्या नावावर राहुल गांधी यांनीच फुली मारली असून गांधी घराण्यातील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी नको, असे राहुल यांचे म्हणणे आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentarios