top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

रोजगार देण्यात राज्यात पालघर अग्रस्थानी




वृत्तसंस्था :- पालघर : राज्यात इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात पालघर जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे. १ एप्रिलपासून कामाची मागणी व मजूर उपस्थिती संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.पालघर जिल्ह्यात १ मे रोजी  १९  हजार ९२८  इतकी मजूर उपस्थिती होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत सोमवारपर्यंत जिल्ह्यात २१७१  कामे सुरू होती. १ मे च्या तुलनेत सोमवापपर्यंत मजूर उपस्थिती ४८ हजार ५४४ इतकी वाढली आहे.  इतकी मजूर उपस्थिती  पालघर जिल्ह्याची ही विक्रमी नोंद आहे.  जिल्ह्यात एक एप्रिलपासून आतापर्यंत २२६१९  कुटुंबातील ४३ हजार २५ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली असून यापैकी २१ हजार २५ ही आदिवासी कुटुंब आहेत. याचाच अर्थ आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही पालघर जिल्हा राज्यात पहिला आहे.रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात विविध यंत्रणा स्तरावर आतापर्यंत १२६१९ कामे शेल्फवर उपलब्ध असून यापैकी ९४२३  कामे ग्रामपंचायत स्तरावर तर ३१९६ कामे विविध यंत्रणांकडे शेल्फवर उपलब्ध आहेत.१ एप्रिलपासून आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये तीन लाख ४१ हजार ४०१ इतकी मनुष्यदिन निर्मिती झालेली असून या मनुष्यदिन निर्मितीमध्येही पालघर जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत गतवर्षी २४ लाख ६१ हजार इतकी मनुष्यदिन निर्मिती झालेली होती.यंदा सोमवारपर्यंत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांवर ४ कोटी८५  लाख १३ हजार  इतका निधी मजुरांच्या मजुरीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.तर मागील वर्षांत पालघर जिल्ह्यात ६६ कोटी ३६ लाख ७५ हजार इतका निधी खर्च झाला. यापैकी ५१ कोटी १७ लाख ६३ हजार इतक्या रकमेचा निधी अकुशल मजूर यांच्यासाठी वापरला गेला.रोजगार हमी योजनेच्या नोंदणीकृत मजुरीच्या दरामध्ये केंद्र शासनाने वाढ केली असून महाराष्ट्र राज्यासाठी २३८ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे. गतवर्षी हा दर २०६ रुपये इतका होता. याचाच अर्थ या मजुरीच्या दरात ३२ रुपयाने वाढ झालेली आहे. यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत या कामांमध्ये पालघर जिल्ह्यात सर्वाधिक मागणी झालेली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या मजुरांना १५ दिवसाच्या आत मजूरी प्रदान करणे बंधनकारक असले तरी पालघर जिल्ह्यात केलेल्या कामांसाठीची मजुरी आठ दिवसाच्या आत प्रशासनामार्फत मजुरांच्या थेट खात्यात जमा करण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे.पालघर जिल्ह्यात सर्वाधिक मजूर उपस्थिती विक्रमगड तालुक्यातील असून ही संख्या २१ हजार ८३  इतकी आहे. त्याखालोखाल जव्हार तालुक्यात ११५५०   मजूर उपस्थिती आहे तर मोखाडा मध्ये १०११८  वाडा तालुक्यात १८०१ तलासरी तालुक्यात १६६३ डहाणू तालुक्यात १६४७,पालघर तालुक्यात ५७८ तर वसई तालुक्यात १०४ मजूर उपस्थिती आहे.जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत दिली जाणारी कामे ही सर्वाधिक ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असून कृषी विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण अशा विविध विभागामार्फत ही कामे जिल्ह्यातील जॉब कार्डधारकांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिली जात आहेत.आदिवासीबहुल भागासाठी रोजगार हमी योजना ही प्रभावी योजना असून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील विक्रमी आदिवासी कुटुंबांना यामध्ये काम मिळालेले आहे. स्थानिक स्तरावर ही कामे उपलब्ध होत असल्यामुळे व मजुरी वेळेवर वाटप झाल्याने अधिकाअधिक मजुरांकडून कामाची मागणी होत आहे.त्यामुळे स्थानिकांचे सबलीकरण होण्यास मदत होत आहे.

5 views0 comments

Bình luận


bottom of page