top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

राज्यपालांची घोषणा / खरिपासाठी एकरी ३ हजार रुपये, तर फळबागेला एकरी ७ हजारांची मदत


(वृतसंस्था) राज्यपालांची मदत तुटपुंजी असल्याचा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा आरोप अतिवृष्टीने उद्ध्वस्त पिकांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी आर्थिक मदतीची घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टर (अडीच एकर) ८ हजार रुपये, तर फळबागायती म्हणजेच बारमाही पिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाकडून दिली जाणार आहे. मात्र २ हेक्टरपर्यंतच्याच नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्यात येईल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सायंकाळी जाहीर केले. या मदतीचे वितरण तातडीने करण्याच्या सूचनाही राज्यपालांनी राज्य प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने राज्याच्या मुख्य सचिवांच्या निगराणीत शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली जाईल. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली होती. १० हजार कोटी रुपयांची तरतूद ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने खरिपाची काढणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यासंदर्भात २ नोव्हेंबरला मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यात नुकसानीची अंतिम आकडेवारी निश्चित होईपर्यंत भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. राज्यपालांची मदत तुटपुंजी असल्याचा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा आरोप ५० लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामातल्या पिकांचा विमा उतरवला आहे. विम्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. तसेच रब्बी हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत होता. राज्यपालांनी मदत जाहीर केल्याने शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अवकाळीत ३३ टक्क्यांच्या वर पिकांचे नुकसान झालेल्या क्षेत्रात पंचनामे सुरू आहेत. तसे न करता सरसकट पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. कोरडवाहूसाठी गुंठ्याला ८० रुपये, फळबागांना १८० रुपयांची मदत क्रूर थट्टाच : किसान सभा १ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ही मदत निव्वळ तुटपुंजी आहे. मात्र काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर करू. २ राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून हेक्टरी सरसकट २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते एकनाथ शिंदेंनी केली. ३ राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि मदतीत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. ४ कोरडवाहू पिकांना गुंठ्याला ८० रुपये, फळबागांना प्रतिगुंठा १८० रुपये मदत देऊन राज्यपालांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याचा आरोप किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले यांनी केला.

15 views0 comments

Comments


bottom of page