top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होईल : मुख्यमंत्री


नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : "महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, याबाबत मी आश्वस्त आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवरुन दिली. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी हे भाष्य केलं. तसंच सत्तेच्या समीकरणासंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतर अकराव्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. भेटीचा विषय अवकाळी पाऊस नुकसानग्रस्तांच्या मदतीचा असला तरी त्यात राज्यातील सत्ता स्थापनेचा मुद्दा नक्कीच उपस्थित झाला असणार. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना अवकाळी पाऊस नुकसानीसोबत सत्ता स्थापनेबाबत भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, "सत्तेच्या समीकरणारसंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, याबाबत मी आश्वस्त आहे."राज्यात नवं सरकार लवकरच स्थापन होईल हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळला. तसंच सरकार कधी आणि कसं स्थापन होणार हे देखील सांगितलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत युतीमधील तिढा लवकरात लवकर सुटण्याची शक्यता नाही. भाजप नेतृत्त्वाने आक्रमक राहण्याचा सल्ला दिल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. मात्र सत्तास्थापनेवरुन दोन्ही पक्षांमधील संघर्षामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेना करत आहे. मात्र शिवसेनेची ही मागणी भाजपला मान्य नाही. त्यामुळे आता शिवसेना-भाजपचं राज्यात सरकार पुन्हा येणार की कोणती नवी समीकरणं जुळणार याची उत्सुकता आहे.

143 views0 comments

Comments


bottom of page