top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

रुग्णांच्या आकडेवारीतील घोळ दूर करा- फडणवीस


वृत्तसंस्था:- मुंबई: लक्षणे नसलेल्या व्यक्तींची करोना चाचणी न करण्याचा निर्णय परत घेऊन आयसीएमआरच्या निकषांचे तंतोतंत पालन करावे आणि करोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीतील घोळ दूर करावा, अशा मागण्या माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  केल्या.मुंबई महापालिकेने १५ एप्रिल रोजी लक्षणे नसलेल्या व्यक्तींची करोना चाचणी बंद  केली. राज्यात सरासरीच्या किती तरी अधिक नमुने पॉझिटिव्ह आले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणूनच ‘आयसीएमआर’च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे ‘अ‍ॅग्रेसिव्ह टेस्टिंग’ हीच रणनीती वापरावी, अशी विनंती फडणवीस यांनी  केली आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींसंदर्भात १०० टक्के चाचण्या केल्याच पाहिजेत, असे दिशानिर्देश ‘आयसीएमआर’ने स्पष्टपणे दिले असताना आवश्यकता वाटली तर चाचण्या करता येईल, असा आदेश काढला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.करोनाग्रस्तांपैकी ६३ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर रुग्णालयात दाखल ७९ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. याचाच अर्थ लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या चाचण्या न करण्याचा निर्णय किती घातक ठरू शकतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे सांख्यिकीदृष्टय़ा ही रुग्णसंख्या कमी दिसेल आणि प्रत्यक्षात मात्र धोका वाढेल, असे फडणवीस म्हणाले.

37 views0 comments

Comments


bottom of page