top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

यावल वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिकाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला


जळगाव,दि. 5 - सातपुडा पर्वतरांगामध्ये दुर्गम भागातील यावल तालुक्यातील लंगडाआंबा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात यावल वन परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. म्हेत्रे व वनरक्षक प्रकाश बारेला, हूकाऱ्या बारेला, रमेश थोरात, विजय शिरसाठ, के. बी. पावरा व अश्रफ तडवी कर्तव्य बजावत असतांना त्यांच्या निदर्शनात काही अज्ञात व्यक्ती शिकार करण्याच्या हेतूने तथा अनधिकृतपणे वृक्षतोड करण्यासाठी लंगडा आंबा परिमंडलात शिरले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हे अधिकारी, कर्मचारी या अज्ञात चोरट्याला रोखण्यासाठी त्याच्या शोधात जंगलात गेले. शोधकार्य सुरू असतांना अचानक त्यांना 30 ते 40 लोकांचा गट अवैधरित्या वृक्षतोड व शिकार करण्याच्या हेतून एकत्र आल्याचे लक्षात आले. चोरट्यांजवळ बेकायदेशीर बंदूक होती. आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वनक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबार केल्यावर सुध्दा वनधिकारी व कर्मचारी तेथून जात नाही हे लक्षात येताच चोरट्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार सुरूच ठेवला. शेवटी वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गोळीबाराला उत्तरादाखल चोरटे पळून जावेत या हेतूने हवेत गोळीबार केला. त्यानंतर भितीने चोरटे हे मध्यप्रदेशच्या दिशेने पळून गेले. या सर्व घटनेची माहिती यावल तालुक्याचे तहसिलदार तथा दंडाधिकारी यांना देण्यात येवून स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. असे सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) यावल, जि.जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

18 views0 comments

Commenti


bottom of page