(वृतसंस्था) गेल्या महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. तसंच यानिमित्ताने शक्तिप्रदर्शनही केले जाईल. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाणार असला तरी १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा महाआघाडीने केला आहे. काही गडबड होऊ नये म्हणून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाईल. हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कामकाजात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांची योजना आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि छोट्या पक्षांसह आघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची सुटका होईल. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. विश्वासदर्शक ठरावानंतर दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, राज्यपालांचे अभिभाषण असा कार्यक्रम मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडल्यावर विश्वासदर्शक ठराव मांडण्याची नियमात तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी अध्यक्षांच्या देखरेखीखाली विश्वासदर्शक ठराव मंजूर करावा, असा आदेश आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला दिला होता. या आदेशाच्या आधारेच हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर केला जाईल. फडणवीस विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेतेपदी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करावी, असे पत्र भाजपकडून सादर करण्यात आले. यानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा रविवारी केली जाईल.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments