राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधितांना घरी सोडले आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश; नातेवाईकांना दिलासा – आरोग्यमंत्री राजेश टोपे वृत्तसंस्था:- मुंबई, दि. ५: कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण काल घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात ११० रुग्णांना पाठविण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कालपर्यंत राज्यात एकूण २४६५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही चाचण्या मोठ्या प्रमाणावर होऊन रुग्णांचे निदान वेळेत होत आहे. राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २३ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यानंतर दररोज राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काल सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील १६५, ठाणे ३, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई-विरार मनपा २३, रायगड ३ तर पनवेल मनपा येथील २ असे मुंबई मंडळात एकूण २२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे मनपा ७२, पिंपरी-चिंचवड मनपा १४, सोलापूर मनपा २२ तर सातारा येथील २ असे पुणे मंडळात एकूण ११० रुग्णांना घरी सोडले. अमरावती मनपा १, बुलढाणा येथे १ तर नागपूर मनपा क्षेत्रात १० रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात एकूण प्रयोगशाळा असून त्यापैकी २५ शासकीय आणि २० खासगी प्रयोगशाळा आहेत. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात पावणे दोन लाख नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments