ओझर -(उपसंपादक ना.वि) गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरु येथे अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळाने वेतन करार व अन्य 29 मागण्यांबाबत उच्च व्यवस्थापनाशी चर्चा केली. परंतु, यात कुठलाही समाधानकारक प्रस्ताव न मिळाल्याने बैठकीचा त्याग करत आजपासून देशातील नऊ प्रभागांतील जवळपास वीस हजार कर्मचाऱ्यांची संप पुकारला आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप पुकारल्याने या संपाचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत असून एचएएलवर अवलंबून अन्य लघु उद्योगांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. एचएएल को-ऑर्डिनेशन कमिटीच्या अधिकाऱ्यांनुसार कामगारांनाही रास्त वेतनवाढ द्यावी या मागणीसाठी व्यवस्थापनाशी चर्चा सुरु होती. व्यवस्थापनाकडून चांगला वेतन करार देण्याच्या आश्वासनानंतर पाच वर्ष मुदतीच्या वेतन कराराची मागणी सोडून सर्व संघटना दहा वर्ष मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या आहेत. परंतु त्यानंतरही व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली असून अधिकारी वर्गाला ३५ टक्के वेतनवाढ दिली असताना कामगार वर्गाला तुटपुंजी फक्त 8 टक्के वाढ देण्याचा अंतिम प्रस्ताव दिला असल्याचे समजत असून त्यामुळे नाराजी आहे. वाढीव पगारवाढीचा फरक पूर्ण मिळून वाढीव पगारवाढीचा लाभ अधिकारी गेली 34 महिने घेत असून कामगारांना जाचक अटी टाकून तुटपुंजी वाढ दिल्याने कामगारांत असंतोष आहे. आंदोलनाचे सर्व पर्याय वापरल्यानंतरही व्यवस्थापन सकारात्मक भूमिका घेत नसल्याने बेमुदत संपाशिवाय पर्याय नसल्याचे मत कामगारांकडून मांडण्यात आले आहे. कंपनी आर्थिक संकटात असेल तर अधिकाऱ्यांना दिलेली 1 जानेवारी 2017 पासूनची वेतनवाढ बंद करावी आणि आर्थिक स्थिती उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगारांना सोबतच वेतनवाढ देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. परंतु कंपनी केवळ कामगारांच्या मागण्यांवर गदा आणत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.संघटना सनदशीर मार्गाने गेली 34 महिने हक्कांसाठी लढा देत असून व्यवस्थापन अधिकारांचा गैरवापर करून कामगारांचा आवाज दाबत आहे. बंगळुरू येथील बैठक केवळ कामगारांची फसवणूक आहे. वर्कलोड आणि इतर अवास्तव कारणे देऊन वेतनवाढ नाकारली जात आहे. संघटना मागण्या मान्य होईपर्यंत लढा देणार आहे. - सचिन ढोमसे, सरचिटणीस, एचएएल कामगार संघटना, ओझर एचएएल उच्च व्यवस्थापनाचा कामगारांकडून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments