top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

पाकिस्तानात ‘समुद्री जिहाद’चा कट, नौसेना ‘हाय अलर्ट’वर


जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तेथील दहशतवाद्यांना भारतात हल्ल्यासाठी चिथावत असल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खांनी यांनी स्वतः पुलवामासारख्या हल्ल्याची भीती यापूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना 'समुद्री जिहाद'चा कट आखत असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने सुत्रांच्या आधारे दिलं आहे. यानंतर नौदलासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला असून भारतीय नौदल कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे.पाकिस्तानातील दहशतवादी संघटना दहशतवाद्यांना समुद्री मार्गे भारतात हल्ला घडविण्याचं प्रशिक्षण देत असल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना, ''नौदल हाय अलर्टवर आहे...सागरी किनारपट्टीची सुरक्षा वाढवण्यात आली असून कोणत्याही प्रकारचा हल्ला नाकाम करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही त्यांच्यातील प्रत्येकाला रोखण्यात(पुरस्कृत दहशतवाद्यांना) आणि त्यांचा हल्ला नाकाम करण्यासाठी पूर्णतः तयार आहोत. कोणालाही जशास तसं प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे'', असं भारतीय नौदलाचे उपप्रमुख मुरलीधर पवार म्हणाले.दरम्यान, सोमवारी जम्मू-काश्मीरबाबतच्या ऐतिहासिक निर्णयानंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायू दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आता भारतीय नौदलासाठीही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जेवढी सतर्कता बाळगण्यात आली तेवढीच सतर्कता बाळगण्याचा इशारा नौदलाला देण्यात आला आहे.

51 views0 comments

Comments


bottom of page