नाशिक – बकरी ईदनिमित्त शहरात लागलेल्या एका शुभेच्छा फलकावर नाशिकऐवजी जाणीवपूर्वक झालेला गुलशनाबादचा उल्लेख चुकीचा आहे. कोणी खोडसाळ प्रवृत्ती डोके वर काढत असून संबंधितांवर पोलीस कारवाई करतील, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी संकेत दिले.
बकरी ईदच्या दिवशी सारडा सर्कल भागात हा शुभेच्छा फलक लागल्याचे सांगितले जाते. त्यावर नाशिकचा उल्लेख गुलशनाबाद केल्यावरून समाज माध्यमांवर तीव्र पडसाद उमटत आहेत. मुहंमद सुफियान रजा फ्रेंड्स सर्कल यांच्यातर्फे हा फलक लावण्यात आल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात आल्यावर तो फलक त्वरीत हटविला गेला. या संदर्भात शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री भुसे यांनी भूमिका मांडली. फलकावरील उल्लेखाची बाब कानावर आली आहे. नाशिकचा उल्लेख जाणीवपूर्वक गुलशनाबाद करणे योग्य नाही. हा चुकीचा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले. काही खोडसाळ प्रवृती डोके वर काढत असल्याचे भुसे यांनी सांगितले.
Комментарии