top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

नाशिकमध्ये नव्याने चार रुग्ण


वृत्तसंस्था:- शहरातील सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील महिला रुग्णाच्या संपर्कातील चार सदस्यांचे अहवाल सकारात्मक आल्याने  जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ७४ वर पोहचली आहे. यामध्ये नाशिक शहरात नऊ, मालेगावमध्ये सर्वाधिक ६२ तर उर्वरित भागातील तीन रुग्णांचा समावेश आहे. गोविंदनगर येथील करोनाबाधित रुग्ण उपचाराअंती बरा झाला असून त्याचा पहिला अहवाल नकारात्मक आला. तर अन्य करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १७ जणांचे अहवालही नकारात्मक आले आहेत.जिल्ह्य़ातील करोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि महापालिका युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. नव्याने बाधित आढळणारे रुग्ण हे आधी करोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींचे नातेवाईक किंवा निकटच्या संपर्कातील आहेत.जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६३ वर्षांच्या महिलेला करोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी अहवालातून उघड झाले होते. या महिलेने कुठेही प्रवास केलेला नव्हता. त्यांचा मुलगा पुण्याहून आलेला होता. त्याच्या संपर्कामुळे ही बाधा झाल्याचे लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने कुटुंबातील अन्य सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण केले. संबंधितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाला. संबंधित महिला रुग्णाच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. महिलेच्या निवास स्थानाभोवतीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आधीच जाहीर झाला आहे. या परिसरात घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. औषध फवारणीचे काम सुरू आहे.दरम्यान, इतर बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १७ जणांचे अहवाल नकारात्मक आले. आरोग्य विभागाने गोविंदनगर येथील करोनाबाधित रुग्णावर यशस्वी उपचार केले. त्याची प्रकृती सुधारली असून पहिला अहवाल नकारात्मक आला आहे. निकषानुसार पुढील प्रक्रिया पार पाडून त्यास रुग्णालयातून घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यापूर्वी लासलगाव येथील बाधित युवकही बरा होऊन घरी परतला आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन, महानगरपालिकेच्या रुग्णालयात सहा, मालेगाव महापालिका आणि शासकीय रुग्णालय यामध्ये एकूण ६२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. करोनामुळे आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.करोनाचा राज्यस्तरावरील वाढता संसर्ग पाहता नाशिकची परिस्थिती नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार उद्योग व्यवसायांना परवानगी देण्यात येत असून संबंधित विभागांकडून मदतवाहिन्या सुरू करण्यात येत आहेत. सर्व नागरिकांनी  सूचनांचे पालन केल्यास सुखरूपपणे या संकटातून बाहेर पडू अन्यथा पुन्हा एकदा टाळेबंदीत अडकावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. लाल, केशरी, हिरवे क्षेत्र हे आरोग्य विभागाशी संबंधित असून त्याचा उद्योग व्यवसायाशी संबंध नाही. सोमवारपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या उद्योगांना सुरू होण्याची परवानगी देण्यात आली आहे. परवानगी म्हणजे टाळेबंदी संपली असे नाही. सामाजिक अंतराचे नियम न पाळता अनावश्यक गर्दी केल्यास पुन्हा नवीन रुग्ण तयार झाला की, पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र करावे लागेल, असा इशारा मांढरे यांनी दिला. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पोलीस, कृषी अशा वेगवेगळ्या विभागाच्या मदतवाहिन्या सुरू झाल्या आहेत. काही अडचण आल्यास त्या क्रमांकावर संपर्क साधला असता अडचण सोडविली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

24 views0 comments

Comments


bottom of page