top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांसाठी एका महिन्यात १२८० खाटांचे सुसज्ज रुग्णालय






वृत्तसंस्था:- सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार

नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या सुविधांमध्ये वाढ करुन अतिदक्षता कक्ष, प्रत्येक बेडवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या विद्यमान व्यवस्थेत बदल करुन केवळ एक महिन्यात सुसज्ज ‘कोविड-19’ हॉस्पिटल तयार करुन 1 हजार 280 रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विशिष्ट कोविड रुग्णालय, कोविड आरोग्य केंद्र व कोविड दक्षता केंद्र उभी केली आहेत. याशिवाय कोविड-19 संशयितांकरिता विलगीकरण केंद्र उभारण्यात आलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, सचिव अजित सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे 1 हजार 280 रुग्णांकरिता दोन स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरु झाले आहे.कोविड हॉस्पिटलची निर्मिती करताना आवश्यक पार्टीशन्ससह प्रामुख्याने Medical Gas Pipeline, Suction, Oxygen supply उपकरणे व ऑक्सिजन बँक प्रस्थापित करण्याकरिता शेडची उभारणी करणे व सर्व अत्याधुनिक उपकरणे स्थापित करणे, प्रसाधनगृह तयार करण्यात आली आहे. 568 कोविड-19 रुग्णांना अतिदक्षतेची सेवा उपलब्ध असणारे दक्षिण-मध्य आशियातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय सज्ज झाले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर परिसरात प्रधानमंत्री स्वास्थ्य योजना अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या (G+2) इमारतीत 120 गंभीर रुग्णांकरिता अतिदक्षता विभाग ऑक्सिजन बँक व इतर उपकरणे स्थापित करण्याकरिता देखील शेडसह सोय व परिसरातील इतर 10 वॉर्डना जोडण्याकरिता अतिदक्षता विभागापासून स्वतंत्र पाथ-वे तयार करण्यात आला. ही सर्व कामे 15 दिवसात पूर्ण करण्यात आली आहेत.

याच परिसरातील उपलब्ध असलेल्या एकूण वॉर्डपैकी 8 वॉर्डचे नूतनीकरण करण्यात आले असून 330 कोविड रुग्णांसाठी (60 अतिगंभीर रुग्णांसाठी व उर्वरित 270 गंभीर रुग्णांसाठी) हे वॉर्ड पूर्ण क्षमतेने वापरण्यात येणार आहेत. या वॉर्डमध्ये रुग्ण दाखल असताना देखील विशेष काळजी घेऊन मेडिकल गॅस पाईपलाईनसह इतर सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

कोविड हॉस्पिटल तयार करताना वॉर्डमध्ये सारी आजाराचे रुग्ण तर काही ठिकाणी कोविड-19 चे रुग्ण देखील ॲडमिट असल्यामुळे कंत्राटदाराचे मजूर पळून जात होते. पेशंट असलेल्या वॉर्डमध्ये सदर मजूर काम करीत असल्याने आवश्यक दक्षता घेताना रुग्णांनाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील ट्रॉमा केअर सेंटर या नवीन इमारतीमध्ये एकूण 262 खाटांची सोय (60 खाटा ICU व 202 खाटा HDU) करण्यात आली आहे. 262 खाटांपैकी 129 खाटांचे मेडिकल गॅस पाईपलाईन व इतर अनुषंगिक उपकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 150 तासांच्या आत पूर्ण करण्यात आले आहे. तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील 2016 मध्ये बांधून झालेली पाच मजली सर्जिकल कॉम्पलेक्स इमारत होती. या इमारतीत अस्तित्वातील 13 वॉर्डचे आधुनिकीकरण व नवीन 9 वॉर्डसह एकूण 22 वॉर्ड कोविड-19 च्या 568 गंभीर रुग्णांसाठी (174 ICU व 394 HDU खाटा) सुसज्ज सोय केवळ 20 दिवसांत पूर्ण झाली आहे.


9 views0 comments

Comments


bottom of page