( शिरपूर प्रतिनिधी: श्री मयूर वैद्य)
राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर धुळे जिल्हा परिषदेवर कोणाची निवड होईल याबाबत विविध कयास व राजकीय आराखडे लावले जात होते अनेकांनी आपली या पदासाठी राजकीय फिल्डिंग देखील जोमात लावली होती मात्र हा विषय राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील व प्रतिष्ठेच्या असल्याने त्यास अत्यंत गोपनीय पद्धतीने हाताळण्यात आले होते.
काल झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये धुळे तालुक्याला प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या मान मिळाला असून उपाध्यक्ष पद पुन्हा शिरपूर तालुक्याच्या वाट्याला आले आहे.
धुळे जिल्हा परिषदेवर बहुमत असलेल्या भाजपाने पुन्हा सत्तेचा गढ राखला आहे. अध्यक्षपदी अश्विनी पवार यांची तर उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र पाटील यांची निवड झाली. त्यांना प्रत्येकी 38 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्थ्यांना केवळ 16 मतांवर समाधान मानावे लागले.
जिल्हा परिषदेचे एकूण 56 सदस्य आहेत. यात भाजपाकडे 36 सदस्य, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 6, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस 7 तर अपक्ष 3 सदस्य आहेत. यापुर्वी सन 2020 मध्ये जि.प.च्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक सदस्य निवडून एकहाती सत्ता मिळविली. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन त्यांच्या काही सदस्यांची संख्या कमी झाली. परंतु 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा काही जागा निवडून भाजपाने जिल्हा परिषदेत बहुमत सिध्द केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने आज नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. सकाळी 11 वाजेपासून निवड प्रक्रियेला सुरूवात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कामकाज पाहिले.
प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी तथा शिवसेनेच्या सुनिता शानाभाऊ सोनवणे यांना 16 मते मिळालीत.
उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे देवेंद्र पाटील हे 38 मते मिळवून विजयी झालेत. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या मोतनबाई पाटील यांना 16 मते मिळाली. तीन अपक्ष सदस्यांपैकी दोघांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकल्याने त्यांना 36 ऐवजी 38 मते मिळालीत.
जिल्हा परिषदेच्या नुतन अध्यक्षपदी भाजपच्या अश्विनी पवार व उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांना संधी मिळाल्याने त्यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. अमरिशभाई पटेल, आ. जयकुमार रावल, महापौर प्रदीप कर्पे, मावळते जि. प. अधक्ष तुषार रंधे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, रामकृष्ण खलाणे, बाळासाहेब भदाणे, बबन चौधरी, प्रा. अरविंद जाधव, आशुतोष पाटील, भाऊसाहेब देसले, किशोर संघवी आदींनी सत्कार , केला.
दरम्यान दोन्ही तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला गेला.
Comments