वृत्तसंस्था :- यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी तसा निराशाजनकच होता. भारतीय प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची अपेक्षा होती त्याऐवजी ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड झाल्याने बरीच लोक निराश होती. आता मात्र २०२३ मध्ये ऑस्कर सोहळ्यात भारतीय चित्रपट नक्कीच झेंडे रोवणार असं चित्र सध्या दिसत आहे.
एक दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपट २०२३ च्या ऑस्करसाठी शॉर्टलीस्ट झाले आहेत. विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ यावर्षी ऑस्करवारी करणार हे बऱ्याच लोकांच्या मनात होतं, पण आता २०२३ च्या ऑस्करसाठी हा चित्रपट शॉर्टलिस्ट झाल्याची बातमी विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. याबरोबरच या चित्रपटातील पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती यांचं नावही उत्कृष्ट अभिनेते म्हणून शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे.
यावर्षाच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘कांतारा’चीसुद्धा ऑस्करच्या २०२३ च्या यादीत निवड झाली आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक कलाकार रिषभ शेट्टी, सप्तमी गौडा यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटाबरोबरच आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठीयवाडी’ आणि ‘आरआरआर’चीसुद्धा निवड झाली आहे.
अकादमी पुरस्कारांच्या अधिकृत वेबसाईटवर या चित्रपटांची आणि निवड झालेल्या कलाकारांची नावं ऑस्कर २०२३ च्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. शिवाय ‘छेल्लो शो’ हा गुजराती चित्रपटसुद्धा या शर्यतीत आहे. एकूणच हे चित्र पाहता यंदा या चित्रपटांपैकी काही चित्रपटांना ऑस्कर मिळेल अशी चित्रपटरसिकांची अपेक्षा आहे.
Comments