उदय अग्निहोत्री चोपडा
भारतीय संस्कृतीचे असलेले विराट स्वरूप व त्याची उदारता आपण सगळे जाणतात. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मांतर्गत येणाऱ्या वर्ण आश्रम धर्मातील शेवटचा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम होय. याच संन्यास आश्रमाची दीक्षा गंगाखेड येथे 30 जून 2023 रोजी पार पडली. दीक्षित रंगनाथ श्रीकृष्ण सेलूकर महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री श्रीकांत सेलूकर यांनी बालपणापासून आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडून, त्याच सोबत राष्ट्रसेवा करून घरातील असलेल्या संस्कार व परंपरे मुळे प्रेरित होऊन ही संन्यास दीक्षा घेतली व आपला अध्यात्मिक प्रवास उच्च कोटीला नेला. या दीक्षाविधीसाठी बेळगाव येथील संकेश्वर पिठाचे पिठाधीश शंकराचार्य स्वामी अभिनव विद्या नृसिंह भारती यांची विशेष उपस्थिती होती तसेच नवगण राजुरी येथील श्री आनंदाश्रम स्वामी हे देखील उपस्थित होते.
वैदिक विद्वान वेदशास्त्र संपन्न सुधाकर शास्त्री धर्मापुरीकर व दत्ताशास्त्री पोहेकर पैठण व अन्य सहाय्यक वैदिक यांनी सतत चार दिवस चालणाऱ्या या संन्यास दीक्षाविधीचे कार्यवहन केले.
बसवकल्याण येथील आनंद सांप्रदायाच्या परंपरेनुसार हा दीक्षाविधी झाला. दीक्षाविधीनंतर श्री श्रीकांत सेलूकर यांचे नूतन नामकरण श्री परमहंस रामानंद सरस्वती स्वामी गुरु सदानंद सरस्वती स्वामी असे झाले.
सतत एक वर्ष झालेल्या गवामयन सोमयागाने पावन झालेल्या महर्षी याज्ञवल्क्य संस्कृत विद्या प्रतिष्ठान यज्ञ भूमी गंगाखेड या ठिकाणी दिक्षित यज्ञेश्वर जी रंगनाथ सेलूकर यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ भूमी व्यवस्थापन, शिष्य मंडळी व स्थानिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला
गंगाखेड नगरीत हा योग तब्बल ८६ वर्षांनी आला आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या संन्यास दीक्षाविधी प्रदीर्घ कालावधी लोटला व त्यानंतर दिनांक 30 जून 2023 रोजी वार शुक्रवार गंगाखेडकरांनी पुनश्च हा सोहळा अनुभवला.......
Comments