वृत्तसंस्था ठाणे: वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी आकृतीबंधला मंजुरी देण्यापाठोपाठ राज्य शासनाने आता आकृतीबंध मधील पद भरतीच्या नियमावलीस मंजुरी दिली आहे. यासंबंधीचा अध्यादेश राज्य शासनाने काढला असून यामुळे ठाणे महापालिकेतील ८८० वाढीव पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली असून ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. सद्य:स्थितीत महापालिकेचे ९ प्रभाग असून, पालिकेचे एकूण क्षेत्रफळ १४७ चौ. कि. मी. एवढे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार इतकी आहे. गेल्या १२ वर्षात पालिकेच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून ही लोकसंख्या आता २४ लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मात्र ठाणे महापालिकेत वाढीव पदांना मंजुरी मिळाली नव्हती. यामुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. तो कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने ८८० वाढीव पदांचा आकृतीबंध तयार केला होता. त्यास राज्याच्या नगरविकास विभागाने गेल्यावर्षी मंजुरी दिली होती.
वाढीव पदांच्या आकृतीबंधला मंजुरी मिळाली असली तरी त्यातील पदांच्या भरतीची नियमावली ठरलेली नव्हती. यामुळे ठाणे महापालिकेत गेले वर्षभर वाढीव पदांची भरती होऊ शकली नव्हती. दरम्यान, या पदांच्या भरती नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्याचा अध्यादेश काढला आहे. यामध्ये सेवा प्रवेश आणि सेवांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या कोट्यातून आणि राज्य शासनाच्या कोट्यातून कोणती किती पदे भरायची, त्याचे नियम आणि निकष ठरवून देण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९०८८ तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत. तसेच सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत. राज्य शासनाने आकृतीबंधमधील पद भरतीच्या नियमावलीस मंजुरी दिली असून यामुळे ८८० वाढीव पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
Comments