वृत्तसंस्था जळगाव :- शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रम होणार्या पोलीस कवायत मैदानावरील तयारीची पाहणी करीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेत सूचना केल्या.
यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी मुख्य व्यासपीठ, सभामंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था; त्याचबरोबर लाभार्थ्यांची येण्या-जाण्याचे मार्ग, बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध दालन, रोजगार मेळावा, कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिर जागा, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी करून प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडून जाणून घेतली.
शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जळगावचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा आतापर्यंतच्या कार्यक्रमांपेक्षा सरस होईल, याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी येताना लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेषत: वयोवृद्ध लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी, बालके, विद्यार्थी यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळ मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करण्याबाबतही त्यांनी सूचित केले.
जिल्ह्यात शासन आपल्या दारी अभियान राबविण्यास १५ एप्रिलपासून सुरुवात झाली. शासनाच्या विविध विभागांमार्फत जिल्ह्यातील दोन लाख ५३ हजार १२४ लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहेत. त्यांपैकी ३५ हजार लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित राहतील. लाभार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहता यावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गाव व तालुका पातळीवरून वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ने-आण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व खासगी मिळून २५० बस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच एक हजार मोटारींसह २१०० पेक्षा अधिक दुचाकी जळगाव शहरात येतील, असे गृहीत धरून एकलव्य क्रीडा संकुल, जी. एस. मैदान, नेरी नाका ट्रॅव्हल्स पॉइंन्ट, सागर पार्क, खानदेश सेंट्रल मॉल येथे वाहनतळ करण्यात आले आहे; त्याचबरोबर एसटी वर्कशॉप, ब्रुक बॅण्ड कॉलनी, रिंग रोड येथे वाहनतळ राखीव ठेवण्यात आले आहेत.
Comments