top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

जळगाव दूध संघ निवडणुकीत खडसे यांना झटका,आमदार मंगेश चव्हाण विजयी


वृत्तसंस्था :- जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल मतमोजणी रविवार, दि.11 सकाळपासून सुरू आहे. या मतमोजणी दरम्यान धक्कादायक निकाल हाती आले आहेत.

यामध्ये दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला असून, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली आहे. यामुळे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा दुध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली. यात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मुख्य प्रशासकपदाची धुरा आली. या निर्णयाच्या विरोधात खडसे गट न्यायालयात गेले. तेथे या निर्णयाला स्थगिती मिळाली. तथापि, त्यांना प्रशासकपदासाठी ३२ दिवसांचा कालावधी मिळाला. या काळात त्यांनी दुध संघातील अपहाराचे प्रकरण शोधून काढत गुन्हा दाखल केला. यानंतर दुध संघाची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आपण खडसे कुटुंबातील सदस्याच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी थेट मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.

निवडणुकीच्या प्रचारात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. स्वत: मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केलेत. तर एकनाथ खडसे यांनी देखील याला प्रत्युत्तर दिले. प्रचाराच्या अंतीम टप्प्यात मंगेश चव्हाण हे अजूनच आक्रमक झाले. मतदानाच्या दिवशीच त्यांनी मतमोजणीत खडसे यांचा मोठा पराभव होणार असल्याचे भाकीत केले होते. तर आज रविवार, दि.11 मतमोजणीतून ही बाब सत्य म्हणून समोर आली आहे.

आज रविवार, दि.11 सकाळी झालेल्या मतमोजणीत मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांचा विजय झाला. ही लढत अतिशय चुरशीची झाली. यात मंगेश चव्हाण यांनी चार मतांनी विजय संपादीत केला. दुध संघाच्या निवडणुकीतील ही सर्वात मोठी लढाई मानली जात होती. हा विजय मिळविल्याने त्यांच्या लौकीकात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

5 views0 comments

Comments


bottom of page