top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

ग्रामोद्योग आयोगाचे सहाय्यक संचालक यांना लाच घेतांना अटक


अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासांठी ४ ग्रामोद्योग आयोगाचे सहाय्यक संचालक हजार रूपयांची लाच घेताना मुंबई चर्चगेट येथील खादी ग्रामोद्योग आयोगाचे सहाय्यक संचालक बसवराज शांताप्पा मालगट्टी (वय ५९ रा.मुंबई) यांना गुरूवारी दुपारी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. मुंबईचा अधिकारी कोल्हापुरात सापडल्याने खळबळ उडाली आहे.तक्रारदार यांनी आइस्क्रीम तयार करण्याचा कारखाना सुरू केला आहे. त्यासाठी पन्हाळा तालुक्यातील येवलूज येथील एका बँकेतुन २०१३ साली ४ लाख रूपये कर्ज घेतले होते. जिल्हा उद्योग भवन मार्फत हे कर्ज प्रकरण केले होते. कर्जफेडीनंतर २५ टक्के अनुदान थेट कर्जदाराच्या खात्यावर परस्पर जमा होते. तक्रारदार यांनी २०१६ मध्ये कर्जाची परफेड केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर उद्योग भवन मार्फत आइस्क्रीम कारखान्याचा तपासणी अहवाल मुंबई येथील खादी ग्रामोद्योग आयोगाकडे पाठवला होता.वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र तक्रारदार यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मुंबईतील खादी ग्रामोद्योग कार्यालयात जाऊन मालगट्टी यांची भेट घेतली. त्यांनी अहवाल अनुकूल आलेला नाही, पुन्हा तपासणी करावी लागेल. त्यासाठी २७ जुन रोजी मी कारखान्यास भेट देऊन पहाणी करून अहवाल देतो, असे सांगितले होते. गुरूवारी त्यांनी कोल्हापुरात तक्रारदारांना हॉटेलमध्ये बोलवून घेत योग्य अहवाल देण्यासाठी ५ हजार रूपयाची लाच द्यावी लागेल असे सांगितले. तडजोडीने ४ हजार रूपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत व सहकाऱ्यांनी सापळा रचून ४ हजार रूपयांची लाच घेताना बसवराज मालगट्टी यांना रंगेहात पकडले.

6 views0 comments

Comments


bottom of page