top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

गायिका गीता माळी यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल


मुंबई:(वृतसंस्था) 'साँग बर्ड' म्हणून प्रसिद्धी पावलेल्या नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर हळहळलेल्या चाहत्यांमध्ये गीता माळींनी टाकलेली शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल होते आहे. अमेरिकेतून परतल्यावर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असल्याची पोस्ट गीता माळी यांनी फेसबुकवर शेअर केली होती. 'जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है' असे म्हणत Very Happy To Black Home Long Time. 'बॅक टू होम' लिहिताना बॅक मध्ये 'एल' अक्षर पडल्याने 'ब्लॅक टू होम' असे झाले. हा खऱ्या अर्थाने काळा दिवस ठरला अशी पोस्ट सोशल मीडियात फिरत आहे. अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळाहून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात गीता माळी यांचे निधन झाले. अपघातात त्यांचे पती विजय माळी हेदेखील जखमी झाले. गीता या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाच्या कार्यक्रमांसाठी गेल्या होत्या. मुंबईहून नाशिकच्या दिशेने गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान येत असता, खर्डी व आसनगाव दरम्यान लाहे गावाजवळ श्वानाला वाचविण्याच्या गडबडीत समोर उभ्या असलेल्या गॅसच्या टँकरला जोरदार धडक दिल्याने गीता यांचा जागीच मृत्यू झाला व त्यांचे पती चालक विजय माळी हे गंभीर जखमी झाले. विजय यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. वयाच्या चौथ्या वर्षापासून गीता यांच्या गाण्याला सुरुवात झाली. प्रत्यक्ष शास्त्रीय गायनास शरद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली १२ व्या वर्षी सुरुवात केली. १९९९ मध्ये त्या संगीत विशारद झाल्या. त्यानंतर एसएमआरके कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तेथे राष्ट्रीय युवा महोत्सवात गायनासाठी सुवर्णपदक मिळाले. पंडित अविराज तायडे, धनंजय धुमाळ, पंडित प्रभाकर कारेकर, विद्याधर व्यास यांच्याकडून संगीताचे मार्गदर्शन घेतले. 'सदाबहार आशा', 'अनमोल लता', 'दिल से दिल तक', 'अखियोंके झरोकेसे', 'देव माझा विठु सावळा', 'धुंदी कळ्यांना' हे कार्यक्रम चांगलेच गाजले. गीता यांनी 'नाग्या', 'कन्हैय्यालाल भगवान', 'कांदे पोहे', 'तुझ्या माझ्या प्रेमाचे' या मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते. अमेरिकेच्या एसवायडीए फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने २०१४ मध्ये त्यांना गाण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी त्या तीन महिने अमेरिकेत होत्या. त्यांना २०१७ मध्ये बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे समाजरत्न हा पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सक्षम महिला पुरस्कार, खान्देश रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन झाले होते. यावेळी गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

126 views0 comments

Comments


bottom of page