वृत्तसंस्था जळगाव : जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने आव्हाणे येथील कानळदा रस्त्यावरील गोदामात टाकलेल्या छाप्यात विनापरवाना रासायनिक व सेंद्रिय खतांसह कीटकनाशकांचा मोठा साठा आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पथकाने सुमारे १५ लाख ४३ हजार २५७ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध शेतकर्यांसह शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण तायडे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, मंडळ कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, कृषी पर्यवेक्षक भामरे, कषी सहाय्यक बालाजी कोळी, वरिष्ठ लिपिक संतोष भावसार यांनी आव्हाणे येथील कानळदा रस्त्यावरील शेखर रवींद्र चौधरी यांच्या मालकीच्या गोदामात छापा टाकला. तेथे खतांचा साठा असल्याचे निदर्शनास आले. कृषी अधिकार्यांनी गोदाममालक चौधरींशी संपर्क साधला. त्यांनी गोदाम वेलेसन फार्मर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (आनंद, गुजरात) या कंपनीला भाडेतत्त्वार दिल्याचे सांगितले. त्यांच्याकडून कंपनी प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक मिळवीत त्याच्याशीही संपर्क केला.
मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर शासकीय पंचांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात गोदामाचे कुलूप तोडले. गोदामातील खतांसह पीकवाढ संजीविके व कीटकनाशकांचा साठ जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कंपनीचा प्रतिनिधी महेश माटे (रा. पिंप्राळा), देविदास भावसार (रा. खोटेनगर), अरविंद माचे (रा. महिसागर) आणि निमेश भोई (रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments