विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांचे निर्देश
सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. एक चांगली बाब म्हणजे मृत्युचे प्रमाण खूपच कमी आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून आणखी रुग्ण वाढणार नाहीत यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्याचे काम करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.कराड येथील विश्रामगृहात कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करीत आहे, त्याचा सविस्तर आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
प्रतिबंधित क्षेत्र सोडून जिल्हाधिकारी हे लॉकडाऊनमध्ये सुट देत आहेत, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर पुढे म्हणाले, शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बाजारपेठेंबाबत निर्णय घेतील. जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून युद्ध पातळीवर काम करीत आहे याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजूरी द्यावी.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. आपल्याबरोबर आपल्या घरातील ज्येष्ठ, लहान मुलांची काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये. तसेच ज्यांना गंभीर आजार आहेत अशांनीही घराबाहेर पडू नये. कोरोना विषाणूवर खात्रीशीर असे औषध नसले तरी तोंडाला मास्क लावणे, वेळोवेळी सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणे व सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टींमुळे विषाणूचे संक्रमण आपण टाळू शकतो. आता बऱ्याच नागरिकांकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत, वैयक्तिक व कौटुंबिक सुरक्षिततेसाठी मोबाईलवर आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शेवटी केले.
कृष्णा मेडिकल कॉलेजला आयुक्तांनी दिली भेट
कोरोना बाधित रुग्णांवर कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येतात. या मेडिकल कॉलेजला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार व सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी सविस्तर माहिती दिली.
कन्टेंमेंट झोन भागास भेट
कन्टेंमेंट झोन असणाऱ्या मलकापूर येथील अहिल्यानगर व सातारा येथील सदरबझार या भागाला विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.
Comments