*(शिरपूर प्रतिनिधी : मयूर वैद्य )* शिरपुर येथे आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या धावपटू खेळाडूंनी धुळे जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंचा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धुळे जिल्हा पोलीस व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने दि 5 फेब्रुवारी 2023 रोजी धुळे येथे 3, 5, 10 व 21 कि.मी. धावणे अशा चार विभागांमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 22 हजार धावपटूंनी सहभाग नोंदविला होता. शिरपूर मधून 150 धावपटू सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेत शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टच्या खेळाडूंनी भरघोस कामगिरी करत पारितोषिक पटकावले. शकिला बाशा वसावे 5 कि.मी. धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक, शेवंता पावरा 10 कि. मी. धावणे प्रथम क्रमांक, आशा कोळी 3 कि. मी. धावणे द्वितीय क्रमांक तसेच सोमनाथ पावरा 10 कि. मी. धावणे तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते शिरपूर जनक विला निवासस्थानी करण्यात आला. यावेळी संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल व क्रीड़ा शिक्षक राहुल स्वर्गे उपस्थित होते. यशस्वी खेळाडूंना क्रीडा समन्वयक डॉ. विनय पवार, प्रा. राहुल स्वर्गे, संदीप देशमुख, पूजा जैन, अॅथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पावरा, दिनेश वसावे, मोनिका पावरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.