top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

आरोग्य विभागाची उडाली झोप; दिल्लीत एकाच कुटुंबातील २६ जणांना करोनाची लागण


वृत्तसंस्था:- करोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात नवी आव्हानं उभी राहत आहेत. दिल्ली आरोग्य विभागाची झोप उडवणारी घटना तबलिकी प्रकरणानंतर समोर आली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील २६ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दक्षिण दिल्लीतील जहाँगीरपुरी परिसरात हे करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.दिल्लीत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण दिल्लीत ७६ कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील दक्षिण दिल्लीतील सी ब्लॉकमध्ये असलेल्या जहाँगीरपुरीतही कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच कुटुंबातील २६ जणांना करोनाची लागण झाली आहे. 'काही कंटेनमेंट झोनमध्ये लोक रस्त्यावर फिरत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर घराबाहेर न पडण्याची सूचना केलेली असताना शेजाऱ्यांच्या घरीही लोक जात आहेत. त्यात जहाँगीरपुरी झोनमध्ये २६ जणांना करोना झाल्याचं चाचणीतून निष्पन्न झालं आहे. हे सर्व बाधित एकाच कुटुंबातील असून याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्यानंतरही हे लोक एकमेकांच्या घरी गेल्यानं करोनाचा संसर्ग झाला आहे,' असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.दिल्लीत आरोग्य विभागानं सामूदायिक तपासणी सुरू केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या नागरिकांच्या तपासण्या सध्या करण्यात येत आहेत. जहाँगीरपुरी कंटेनमेंट झोनमधील ६० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात ३१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र, आरोग्य विभागाला धक्का तेव्हा बसला जेव्हा ३१ पैकी २६ जण एकाच कुटुंबातील निघाले. ३१ करोनाबाधित रूग्णांमध्ये १८ महिला, १२ पुरूष आणि एका सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. १२ जण १० ते १९ वयोगटातील आहेत. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. याच कुटुंबातील एका ६० वर्षीय महिलेचा करोनामुळे ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना दिली.'लॉकडाउनच्या काळात असंख्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. पण, जर आपण शिस्त पाळली नाही, तर आपल्याला त्रास सोसावा लागेल. अनेक लोक असे आहेत, ज्यांना वाटत की त्यांना करोनाचा संसर्ग होणार नाही. हे चुकीचं आहे. तुम्ही मंत्री आहात की, शिपाई. श्रीमंत असो वा गरीब हा आजार कोणालाही होऊ शकतो. तुम्हाला संसर्ग होईल की नाही, हे प्रत्येकावर अवलंबून आहे,' असं सांगत केजरीवाल यांनी लोकांना सूचनाचं पालन करून घरात राहण्याचं आवाहन केलं.

8 views0 comments

Comments


bottom of page