top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

अखेर पी.चिदंबरम यांना अटक ; जाणून घ्या सविस्तर प्रकरण


नवी दिल्ली - (वृत्तसंस्था) आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पी. चिदंबरम यांना सीबीआयने अखेर अटक केली आहे. २७ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर सीबीआयने पी.चिदंबरम यांना त्यांच्या जोरबाग येथील घरातून अटक केली आहे. एअरसेल मॅक्सीसचा व्यवहार 3,500 कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मिडिया खटल्यात 305 कोटी रुपयांचा संबंध आहे. पी. चिदंबरम हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (युपीए-1) अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा (एफआयपीबी) हिरवा कंदील वरील दोन्ही प्रकरणात दिला गेला होता व त्याचवेळी कथित गैरव्यवहार झाल्यामुळे पी. चिदंबरम यांची त्यातील भूमिका काय याची चौकशी यंत्रणा करीत आहेत.सीबीआयची टीम पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चिदंबरम यांच्या घराबाहेर जमा झाले. नरेंद्र मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करून पी.चिदंबरम यांना अडकविण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. सीबीआयचे मुख्य संचालकही पी.चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले. कार्यकर्त्यानी मोदी विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यादरम्यान पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.  २७ तासांनंतर बेपत्ता झालेले पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी आयएनएक्स प्रकरणात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्यावर कोणतंही आरोपपत्र दाखल झालं नाही असा दावा केला आहे. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर पी. चिदंबरम हे जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर काही वेळातच सीबीआयची टीमही त्यांच्या घरी दाखल झाली होती.  सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही, माझा मुलभूत हक्क हिरावला जातोय. मागील २७ तासांपासून अनेक भ्रम पसरविले जात आहेत. मी आणि माझं कुटुंब यात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात माझं नाव नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होईल. गेल्या २७ तासांत वकिलांसोबत पुढील लढण्याची तयारी करत होतो. रात्रभर कागदपत्रे तयार केली जात होती. तपास यंत्रणांही कायद्याचं पालन केलं पाहिजे असं चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगी शिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल सायंकाळपासून चिदंबरम यांचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यामुळे ईडीने चिदंबरम यांचा शोध सुरू ठेवला होता. धक्कादायक म्हणजे चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या रकमेतून स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत बंगला खरेदी केला आहे. त्याशिवाय कार्तीने देश-विदेशात अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली. १५ मे २०१७ - कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयने केला गुन्हा दाखल,  एफआयपीबीकडून लाच घेऊन अनियमितता केल्याचा आरोप केला.१६ जून २०१७ - केंद्रीय गृहमंत्रालयाने कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली.१० ऑगस्ट २०१७ - मद्रास हायकोर्टाने कार्ती चिदंबरम यांच्या लुकआऊट नोटिशीला स्थगिती दिली.१४ ऑगस्ट  २०१७ - लुकआऊट नोटिशीवर मद्रास हायकोर्टाने दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठविली होती.१८ ऑगस्ट २०१७ - सुप्रीम कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना २३ ऑगस्टपर्यंत सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.२२ सप्टेंबर २०१७ - सुप्रीम कोर्टात सीबीआयने कार्ती चिदंबरम यांना परदेशात जाण्यापासून रोखावं अशी मागणी केली. ते बँक खात्यातील पुरावे नष्ट करु शकतात असा आरोप सीबीआयने केला होता.९ ऑक्टोबर २०१७ - सुप्रीम कोर्टाकडे कार्ती चिदंबरम यांनी त्यांच्या मुलीच्या एडमिशनसाठी ब्रिटनला जाण्याची परवानगी मागितली होती.२० नोव्हेंबर २०१७ - सुप्रीम कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना ब्रिटनला जाण्याची परवानगी दिली होती.८ डिसेंबर २०१७ - एअरसेल मॅक्सीस व्यवहारात सीबीआय समन्सविरोधात कार्ती यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.१६ फेब्रुवारी २०१८ - कार्ती चिदंबरम यांचे सीए एस. भाष्करमण यांना सीबीआयने अटक केली. २० फेब्रुवारी २०१८ - परदेशातून परतल्यानंतर कार्ती चिदंबरम यांना चेन्नई एअरपोर्टवरुन अटक करून दिल्लीला घेऊन जाण्यात आले.२३ मार्च २०१८ - २३ दिवसानंतर कार्ती चिदंबरम यांना जामीन मिळाला होता.२५ जुलै २०१८ - हायकोर्टाने पी. चिदंबरम यांना अटकेपासून वाचण्यासाठी अंतरिम जामीन दिला. ११ ऑक्टोबर २०१८ - आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग आरोपाखाली ईडीने कार्ती यांची ५४ कोटींची मालमत्ता जप्त केली होती.११ जुलै २०१९ - इंद्राणी या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनल्या. इंद्राणीने सांगितले FIPB च्या मान्यतेच्या बदल्यात पी.चिदंबरम यांना पीटर यांना त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना व्यवसायात मदत करण्यास सांगितली होती.२० ऑगस्ट २०१९ - दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांचा अंतरिम जामीन फेटाळून लावला आणि अखेर २१ ऑगस्ट २०१९ - पी. चिदंबरम यांना त्यांच्या दिल्लीतील जोराबाग निवासस्थानातून सीबीआयने अटक त्यांना केली.

133 views0 comments

Comments


bottom of page